पोलीस निवृत्ती नियोजन

पोलिसांनी निवृत्तीनंतर पैशाचे नियोजन करू नये ते आदी करावे तरच त्यांना आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवता येईल.

कमावत्या दिवसांतच आपण आर्थिक नियोजन कसे करता यावर तुमचे निवृत्तीपश्चातचे जीवन कसे घालवू शकतो हे ठरत असते. आपल्या कमाईच्या वर्षांमध्ये सेवानिवृत्तीचा निधी जितका जास्त असेल तितके आपले निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सोपे, समाधानी होऊ शकते.

शेजारचे मोहिते काका यांचा नुकताच अमृतमहोत्सव साजरा झाला. समारंभासाठी जमलेल्या त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तब्येतीकडे पाहता काहींनी त्यांच्यासाठी १०० वर्षांच्या निरोगी जीवनमानाची सदिच्छाही व्यक्त केली. परंतु मोहिते यांची चिंता वेगळीच होती.

सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले मोहिते यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाट्याने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते.

मोहिते यांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका व्हाव्यात यासाठी काय करता येईल?

निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे करता यावर तुमचे निवृत्तीपश्चातचे जीवन कसे घालवू शकतो हे ठरत असते. आपल्या कमाईच्या वर्षांमध्ये सेवानिवृत्तीचा निधी जितका जास्त असेल तितके आपले निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सोपे, समाधानी होऊ शकते.

निवृत्तीसाठी योजना लवकर सुरू करा

वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमच्याकडे कमावत्या ३५ वर्षांची कारकीर्द असते. वैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळे, भारतातील सरासरी आयुर्मानात वाढ होत आहे. तुम्ही वयाच्या ९० वर्षांपर्यंत जगाल असे समजून तुमचे नियोजन असायला हवे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सेवानिवृत्त नंतरच्या आयुष्याच्या ३० वर्षांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. या नियोजनातील एक विरोधाभास असा की, तुमच्या कारकीर्दीची ३५ वर्षे पगारासह होती, उर्वरित ३५ वर्षे निवृत्तीची असतील. आणखी एक विरोधाभास म्हणजे तुमच्या घरखर्चात महागाईमुळे वाढ होईल. वयाच्या ४० व्या वर्षी तुमचा घरखर्च १ लाख रुपये असल्यास, तोच खर्च वयाच्या ६० व्या वर्षी २.६५ लाख रुपयांच्या घरात गेलेला असेल. वयाच्या ८० व्या वर्षी तो ७ लाख रुपये तर वयाच्या ९० व्या वर्षी ११.१५ लाख रुपये झालेला असेल. थोडक्यात, महागाईमुळे खर्च ५० वर्षांत ११ पटींनी वाढण्याची शक्यता आहे. ही संख्या अविश्वनीय वाटू शकेल परंतु हे सत्य आहे. परंतु महागाई दर ५ टक्के गृहीत धरून ही रक्कम काढली आहे, जी वास्तवाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे, आपण महागाईवर मात करणारा परतावा मिळविणे आवश्यक आहे. म्हणूनच कमावत्या वयात सेवानिवृत्तीसाठी मोठ्या निधीची तरतूद करणे गरजेचे आहे.

 

माणूस म्हणतो पैसा आला कि मी काहीतरी करेन, पैसा म्हणतो कि तू काही तरी कर मगच मी येईन.”

सेवानिवृत्ती कोषाचे व्यवस्थापन

पुरेसा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी दोन प्रमुख उपाय आहेत. पहिला उपाय बचतीस लवकर सुरुवात करणे आणि दुसरा मोठा हिस्सा समभागांत आणि समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांत गुंतविणे. पहिल्या उपायामुळे तुमच्या पैशाला दीर्घ कालावधीसाठी चक्रवाढ लाभ होईल. आणि समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणुकीच्या उच्च परतावा व्युत्पन्न करण्याच्या क्षमतेमुळे चक्रवाढीचा दर अधिक असल्याने तुमच्या बचतीचे मूल्य तुम्ही टिकवून ठेवू शकाल. उदाहरणार्थ, वार्षिक १२ टक्के परतावा गृहीत धरून २५ च्या वर्षांपासून ६०व्या वर्षापर्यंत मासिक १० हजारांच्या गुंतवणुकीने सुरुवात करावी आणि दरवर्षी त्यात ५ टक्के वाढ करत गेल्यास १.०८ कोटींच्या मुद्दलावर ९.९६ कोटी रक्कम ६० व्या वर्षी उपलब्ध असेल. परंतु या गुंतवणुकीस पाच वर्षांचा विलंब केल्यास, ६० व्या वर्षी ५.२५ कोटींचाच कोष उपलब्ध होईल. वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजे पाच वर्षे विलंबाने गुंतवणुकीस सुरुवात केल्यास आणि गुंतवणुकीत वार्षिक वाढ न केल्यास निवृत्तीसमयी ३.२५ कोटी रुपये उपलब्ध होतील.

वरील उदाहरणावरून ‘एसआयपी’ रकमेत वार्षिक वाढ करणे आणि निवृत्ती नियोजनाच्या बचतीस लवकर सुरुवात करणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येईल. त्याचबरोबर पुरेशा रकमेचा वैद्यकीय विमा असणेदेखील आवश्यक आहे जेणेकरून सेवानिवृत्तीनंतरचे कोणत्याही मोठ्या आरोग्यविषयक खर्चाची भरपाई विमा कंपनी देईल. आणि निवृत्ती नियोजन कोष अबाधित राहील. ‘एसआयपी’प्रमाणे, येथेही लहान वयात आरोग्य विमा घेतल्यास विम्याचा हप्ता कमी बसेल.

निवृत्ती नियोजनाचा तिसरा भाग म्हणजे तुमचा निवृत्ती कोष किमान ३० वर्षे टिकून राहण्यास सक्षम असायला हवा. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी दोहोंपैकी शेवटच्या हयात जोडीदारापेक्षा जास्त काळ हा कोष तग धरू शकेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, निवृत्तीनंतरही जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओचे काही भाग समभागसंलग्न म्युच्युअल फंडात असल्यास, महागाईवर मात करण्यास मदत करू शकतो.

म्युच्युअल फंड हे ‘एसआयपी’द्वारे जमा करण्यासाठी अधिक ओळखले जातात, परंतु ते ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन्स (एसडब्ल्यूपी)’द्वारे नियमित उत्पन्न मिळविण्याचे एक साधन ठरू शकतात. ‘एसडब्ल्यूपी’देखील निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांपेक्षा अधिक कर कार्यक्षम असतात. पारंपरिक ठेवींवरील व्याज उत्पन्न हे ‘एसडब्ल्यूपी’पेक्षा कमी कर कार्यक्षम आहे. ‘एसडब्ल्यूपी’ सुरू करण्यासाठी हायब्रीड इक्विटी फंड, आणि डेट फंड या एका फंड प्रकाराचा वापर करता येईल.

‘एसडब्ल्यूपी’ करताना मालमत्ता विभाजन, पोर्टफोलिओ संतुलन विचारात घेणे अत्यंत आवश्यक असते.

थोडक्यात.

  • निवृत्ती नियोजनास निवृत्ती जवळ आल्यावर नव्हे तर पहिल्या पगारापासून सुरुवात करणे आवश्यक आहे.
  • समभाग गुंतवणूक जोखमीची असली तरी वयाच्या साठीनंतरही काही प्रमाणात चालू ठेवली पाहिजे. समभाग गुंतवणुकीची मात्रा ‘शंभर वजा वय’ या सूत्राप्रमाणे राखणे आवश्यक आहे.
  • म्युच्युअल फंडांद्वारे ‘एसडब्ल्यूपी’ हा निवृत्तीदरम्यान नियमित उत्पन्नाचा एक खात्रीशीर आणि कर-कार्यक्षम मार्ग आहे.

एकूणात, काय तर निवृत्तीचे नियोजन महत्त्वाचे आहे. कारण पैशाशिवाय तुम्ही तरुण राहू शकता, परंतु पैशाशिवाय वृद्धत्व सहन करता येणे खूपच अवघड असते.

अविनाश निकम ( रिटायरमेंट एक्स्पर्ट )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This field is required.

This field is required.